‘त्या’ चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जालन्याच्या जागेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकेर यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाईल याची सर्वांना चिंता लागली आहे.

अर्जुन खोतकर यांनी कालच(मंगळवार दि 5 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर जालन्यात रावसाहेब दानवेंविरोधात उमेदवारीसाठी दंड थोपटलेल्या अर्जुन खोतकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो अंतिम राहिल. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर अर्जुन खोतकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात दंड थोपटले होते.

दरम्यान जालना मतदारसंघ हा शिवसेनेकडे घ्यावा अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार मी लोकसभेची तयारी केली होती, आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांबाबत देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.