मंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – ‘शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग आहे, लाकडे नाहीत, जागा नाही म्हणून शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी किंवा ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्यावर बोलाल तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची, संपत्ती जप्त करण्याची धमकी महाराष्ट्राने नागरिकांना दिली नाही, हे सारे प्रकार ज्या राज्यात घडले, तिथे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एखादे पत्र लिहिले तर त्यातून तिथे काहीतरी सुधारणा होईल, अशी टीका सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली. चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपवर हल्ला चढवला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना बाधित राज्य असल्याने आणप जास्त काळजी घेतली पाहिजे, यात दुमत नाही, पण महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक सच्चा मराठी नागरिक म्हणून मला किमान हे समाधान आहे की, माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांचा आकड्यांमध्ये लपवाछपवी केली नाही. शासकीय नोंदींमध्ये मृतांची संख्या बोटावर मोजण्याइतकी ठेवून स्मशानात रात्रंदिवस जळणाऱ्या चिता लपवण्यासाठी पत्रे ठोकण्याचे पाप महाराष्ट्राने केले नाही, असा टोला चव्हाण यांनी भाजपला लगावला.

देशाच्या कोरोना परिस्थितीला जणू महाराष्ट्राच जबाबदार आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातून जाणवते. भाजपवरील महाराष्ट्रद्रोही हा ठपका ते या पत्रातून खरा ठरवीत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्याबद्दल चुकीची प्रतिमा तयार करुन नका. भारतात कोरोना कसा वाढला, ते संपूर्ण देशाला आणि आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. खासदार राहुल गांधी यांनी मागील वर्षीच इशारा दिला होता, मात्र भाजपने त्यांची थट्टा केली, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी पुढे म्हटले, की यंदा पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने लाखो लोक गोळा केले. कुंभमेळ्याबाबत निष्काळजीपणा केला. कोरोनाऐवजी निवडणुकीला पहिले प्राधान्य दिले. त्यामुळे देशातील कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचे आत्मपरीक्षण फडणवीस यांनी केले पाहिजे. तसेच या सगळ्या मुंद्यांवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवण्याचे धाडस दाखवावे, असे अशोक चव्हाण म्हणाले.