भाजपानंतर बच्चू कडू यांनी केलं इंदुरीकर महाराजांचे समर्थन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याने त्यांच्यावर वाद ओढवला असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचे समर्थन केले आहे. नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईल असे नाही. इंदुरीकर महाराजांवर राज्य सरकार गुन्हा दाखल करणार नाही अशी माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली.

बच्चू कडू म्हणाले की दोन तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. तो माझ्याकडून किंवा इंदुरीकर महाराज यांच्याकडूनही जाऊ शकतो. आपल्या देशात एखादा शब्द पकडणे आणि तो दाखवणे ही चुकीची सवय लागली आहे, ती बदलणे गरजेचे आहे. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. त्यामुळे इंदुरीकरांनाही नोटीस दिली आहे. त्याची चौकशी होईल.

गेल्या काही दिवसांपासून किर्तनकार इंदुरीकर महाराज वादच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यानंतर काहींकडून त्यांचे समर्थन होत आहे तर काहींकडून त्यांना विरोध होत आहे. यात राजकीय पक्ष देखील आपली भूमिका मांडण्यास मागे नाही.

या वक्तव्याने इंदुरीकर महाराजांवर ओढावला वाद –
इंदुरीकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात त्यांनी किर्तनादरम्यान स्त्रीसंगवरुन सम-विषमचं गणित मांडलं होतं. त्यात ते म्हणाले होते की स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते.

परंतु हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या सदस्यांनी केला आहे. त्यानुसार समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. एवढेच नाही तर या नोटीशीनंतर पुरावे मिळाले तर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.