SSR Death Case : सुशांतच्या प्रकरणाचा तपास CBI कडे गेला ते बरं झालं, ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेलं हे बरं झालं. नाहीतर मुंबई पोलीस चांगलं काम करत नाहीत. कुणाला तरी वाचवत आहेत, असा आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य बाहेर येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व्यक्त केला. भुजबळ यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या बांद्रा येथील फ्लॅट मध्ये उपस्थित असणारे त्याचा स्टाफ आणि मित्र सिद्धार्थ पिठानीच्या चौकशीनंतर आता सीबीआय रिया चक्रावर्तीची चौकशी करणार आहे. सीबीआय आता कोणत्याही क्षणी रियाला चौकशीसाठी बोलावू शकते. सीबीआय रियाला चौकशीसाठी बोलावून अनेक प्रश्न विचारु शकते. याआधी ईडीकडून रियाची दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी रियासोबत तिचा भाऊ आणि वडील उपस्थित होते.

दरम्यान, सुशांत आठवड्यातून एक दोनवेळा घरी पार्टी करत असल्याची माहिती सुशांतच्या घरात काम करणाऱ्या नीरज सिंहने दिली. या पार्टीवेळी तो दारु प्यायचा, गांजा आणि सिगारेटही ओढायचा. सॅम्युअल जेकब सुशांतला गांजा, सिगारेटचा रोल तयार करुन देत असायचा. कधी कधी मी सुद्धा रोल बनवून द्यायचो, असे निरजने सांगितले. मृत्यूच्या आधी सुशांतने तीन दिवसांपूर्वी रोल तयार करुन दिले होते. मृत्यूनंतर जेव्हा सिगारेटचा बॉक्स पाहिला तर तो रिकामाच होता, असंही त्याने पोलिसांना दिलेल्या तीन पानी जबाबात म्हटले आहे.