दिलीप वळसे-पाटील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी होते उपस्थित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  कोरोनाने ( Corona) जगभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातले असून सामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेत्यांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे. ठाकरे सरकारमधील ( Thackery Government) अनेक मंत्र्यांना कोरोना झाल्यानंतर आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Valse Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार( Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

याबाबत माहिती देताना दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे ( BJP) नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा सोहळा मुंबईत पार पडला होता. यावेळी शरद पवारांपासून ( Sharad Pawar) राष्ट्रवादीचे ( NCP) अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, त्यावेळी दिलीप वळसे पाटीलसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यामुळे वळसे पाटलांना कोरोनाची लागण झाल्याने इतर नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यामुळे आता या सोहळ्यात हजर असणाऱ्या नेत्यांची देखील धाकधूक वाढली आहे.

You might also like