…म्हणून मंत्री महोदय म्हणाले, ‘राहुल गांधींना शाळेत पाठवावं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांना माहिती मिळावी. राहुल गांधी यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्याची गरज आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यावर केली. राहुल गांधी यांनी मत्स्यपालनासाठी वेगळे मंत्रालय तयार करण्याची मागणी केली होती. त्यावर गिरीराज सिंह यांनी हे वक्तव्य केले.

भाजपच्या खासदार सुनीता दुग्गल लोकसभेत भाषण करत होत्या. त्यामध्ये त्यांनी मत्स्यपालन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबाबत भाष्य केले. त्यावर बोलताना गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी 2 फेब्रुवारीलाच लोकसभेत मत्स्यपालन विभागाबद्दल प्रश्न विचारला होता. पण काही दिवसांतच असा विभाग देशात असल्याचा त्यांना विसर पडला. राहुल गांधींच्या स्मरणशक्तीला काय झाले काही समजत नाही. त्यांनी यावर तारांकित प्रश्न उपस्थित केला. मात्र, कोची आणि पुदुच्चेरीला गेल्यावर त्यांना याचा विसर पडला. मत्स्यपालन विभाग आधीपासूनच कार्यरत असल्याचेही ते विसरले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

मत्स्यपालनासाठी वेगळे मंत्रालय तयार करण्याची मागणी केली. आमचे सरकार आल्यावर मत्स्यपालन विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करू, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते. त्यावरून गिरीराज सिंह यांनी निशाणा साधला.