हसन मुश्रीफ यांच्याकडून भाजपला सल्ला, म्हणाले – ‘फडणवीसांची गोवा, गुजरात या राज्यांतील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करावी’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यात कोरोना संकटाचे वारे आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपच्या चर्चा रंगल्या आहेत. असं असतानाच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांची सध्या गुजरात, गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यात गरज आहे. तेथील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी असा, टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले, फडणवीस यांना पुढचे साडेतीन वर्ष नाही तर १० वर्षांत सुद्धा महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी ‘मी पुन्हा येईन’ ची स्वप्ने पाहू नये, असा घणाघात देखील त्यांनी लगावला आहे. गोव्यात प्राणवायू अभावी करोनाचे रुग्ण बळी जात आहे. उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह वाहत आहेत. गुजरातमध्ये कोरोनाची स्थिती भयंकर आहे. तरी देखील या ३ राज्यात कोरोना मृतांची आकडेवारी लपवालपवी केली जाते. म्हणून भाजप नेत्यानी फडणवीस यांची तेथील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करावी. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. फडणवीस यांची येथे काहीही गरज नसल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला.

पुढे बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. पुढे महाराष्ट्रातील कोकणात आणि केरळपर्यंत गेले असते तर बरे झाले असते. मात्र, तसे झाले नाही. पंतप्रधान हे फक्त गुजरातचे नाहीत ते सगळ्या देशाचे आहेत. परंतु, ते तसे वागताना दिसत नाहीत. असे देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. या दरम्यान, खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. काही दवाखान्यात पैसे मिळवण्यासाठी धडपड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. वेळेत रुग्ण दाखल होऊनही ज्या दवाखान्यात रुग्ण दगावत आहेत अशा दवाखान्याची फेर ऑडिट करण्याची विनंती करणार असल्याचे देखील त्यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले आहे.