Hasan Mushrif : स्फोटके कुणी ठेवली? चंद्रकांतदादांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – परमबीर सिंग यांनी ज्या दिवशी लेटरबॉम्ब टाकला त्याच दिवशी या प्रकरणातील काळेबेरे आहे हे निश्चित होते. सचिन वाझे यांची नियुक्ती त्यांनीच केली. तपास त्यांनीच दिला. फक्त आमच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी हा डाव असून इतका सगळा तपास झाला आहे, तर मग स्फोटके कुणी ठेवली ? हे जनतेसमोर आणा अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली. ते गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरादर टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ यांनी सामना चित्रपटातील संदर्भ देत मारुती कांबळेचं काय झाले ? अशी विचारणा करत स्फोटके कुणी ठेवली ? हे जनतेसमोर आणा, अशी मागणी त्यांनी केली. मुश्रीफांना प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्याची घाई असते. मात्र, दादांनी या प्रकरणातील खरे काय सांगावे. परमबीर सिंग यांना हाताशी धरुन महाविकास आघाडीला बदनाम करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असून त्यातून ही आघाडी घट्ट होईल व भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, काल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयने छापे टाकले. हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. तसेच अद्याप अँटिलिया प्रकरणाचा छडा का लागला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पटलांनी या प्रकरणातील खरे काय ते सांगावे, अशी मागणी केली.