झारखंड : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री, देशात पहिल्यांदाच

पाटणा : वृत्त संस्था  – झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक अजब घटना होत असून जमशेटपूर (पूर्व) मधून मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या विरोधात त्यांच्यात मंत्रिमंडळातील माजी मंत्री सरयु रॉय हे निवडणुक लढवत आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दल यांच्या युतीचे सरकार असताना संयुक्त जनता दलाने आपला उमेदवार मागे घेऊन सरयु रॉय यांना पाठिंबा दिला आहे. यावरच हे थांबत नाही तर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नीतीश कुमार हे रॉय यांनी विनंती केल्यास त्यांच्या प्रचारात भाग घेणार आहेत. देशात प्रथमच मुख्यमंत्री व त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री एकमेकाविरोधात उभे असल्याचे दिसत आहे.

बिहारमध्ये संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पक्ष यांचेी भाजपाबरोबर युती आहे. मात्र, झारखंडमध्ये ते भाजपाविरोधात स्वतंत्रपणे निवडणुक लढवत आहे. सरयु रॉय हे झारखंडमधील भाजपाचे सर्वात लोकप्रिय नेते होते. बिहारमधील चारा घोटाळा उघडकीस आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या आंदोलन व न्यायालयीन लढ्याने आतापर्यंत तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. असे असतानाही भाजपामधील राजकारणामुळे त्यांना यंदा पक्षाने तिकीट नाकारले. त्यावर रॉय यांनी नीतीश कुमार यांच्याशी माझी असलेली जवळीक मला भाजपाने तिकीट नाकारण्याचे एक कारण असू शकते, असे सांगितले होते.

आपल्याला तिकीट नाकारल्याने चिडलेल्या रॉय यांनी थेट मुख्यमंत्री रघुबर दास यांना आव्हान दिले आहे. त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत मी तीन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठविले आहे, आता चौथ्याही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठविणार, हा त्यांनी त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला आहे. त्यामुळे झारखंडमधील जमशेटपूर (पूर्व) येथील लढत रंगतदार झाली आहे. झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान होत असून त्यानंतर २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Visit :  Policenama.com