इंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘हे वित्त नियोजन आहे का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळातही भरघोस नफा कमावणाऱ्या सरकारी तेल विपणन कंपन्या आणि या कंपन्यांकडून लाभांश रुपाने केंद्र सरकारच्या तिजोरीत पडणारी मोठी भर, असे चित्र असताना सामान्य नागरिकांना मात्र दिवसेंदिवस इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या काळामध्ये इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, निवडणुकांचे निकाल लागताच दररोज इंधन दरवाढ होत असून, याची वाटचाल पुन्हा शंभरीच्या दिशेने होऊ लागली आहे. इंधन दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील म्हणाले, निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय वित्त नियोजन आहे का ?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. कोरोना परिस्थितीत देशात व राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालय एक वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेटचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच ! हे काय नियोजन आहे यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.

देशात परभणीत सर्वाधिक दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लिटर झाली आहे. महाराष्ट्रात इंधन दरवाढ सुरुच आहे. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे, तर डिझेल 90.68 रुपये दराने विक्री होत आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 तर डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.