म्हणून… भाजप मंत्र्याने घेतली घरपोच लस, केला अजब खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लसीकरणासाठी नागरिकांना सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून लस घेणे अनिवार्य आहे. असे असतानाही कर्नाटकातील भाजपचे कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी सरकारी केंद्रात न जाता घरीच लस घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर दिग्गज नेत्यांनी रुग्णालयात जाऊन लस घेतली. परंतु यांनी थेट रुग्णालय कर्मचाऱ्यांनाच घरी बोलावत लस घेतल्याने जोरदार टीका होत आहे. या प्रकाराची केंद्रीय आरोग्य विभागानेही दखल घेतली असून कर्नाटक सरकारकडून संबंधीत प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.

हावेरी जिल्ह्यातील हिरेकेरुर आपल्या गावातील घरी बी. सी. पाटील यांनी कोरोना लस घेतली आहे. तसेच घरीच लस का घेतली याचा अजब खुलासाही पाटील यांनी केला आहे. कोरोनावरील लस असुरक्षित आहे, ही नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी आपण रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच लस घेतल्याचे अजब उत्तर त्यांनी  दिले आहे.  तसेच मी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली असती तर आपल्यामुळे इतर नागरिकांना ताटकळत राहवे लागले असते.  मात्र इथे मी नागरिकांनाही भेटू शकतो अन् लसही घेऊ शकतो. यात चुकीच काय आहे ? असे पाटील यांनी म्हटले आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, प्रोटोकॉलनुसार अशी कुठलीही परवानगी नाही. राज्य सरकारला यासंबंधी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे भूषण यांनी सांगितले.  तसेच याप्रकरणी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र डोड्डामणी यांनी तालुक्याचे आरोग्य अधिकारी झेड. आर. मकंदर यांना नोटीस बजावली आहे.