खूप बचाव केला, पण शेवटी ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, राज्यमंत्री तनपुरेंचे ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याच दरम्यान अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तनपुरे यांनी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वत: ट्विट करत माहिती दिली. कोरोनाच्या संसर्गाशी नेटाने लढणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकरमधील मंत्र्यांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तनपुरे यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. तरनपुरे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. पुरेशी काळजी घेत होतो. मात्र कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वत: काळजी घेत आहे. आपण स्वत:ची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रुजू होणार, असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे. ऐन अधिवेशनाच्या वेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना अधिवेशनात भाग घेता येणार नाही.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अस्लम शेख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.