केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र, म्हणाले – ‘संकट आले की केंद्राकडे बोट दाखवणे हीच राज्य सरकारची ओळख’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. असे असताना केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर टीका करत आहेत. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुठलेही संकट आले की केंद्र सरकारकडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणे ही आता राज्य सरकारची ओळख झाली आहे, असे म्हणत दानवे यानी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. आज केंद्र सरकारकडून मिळण्याऱ्या सर्व मदतींमध्ये महाराष्ट्राला मिळणारा वाटा सर्वात मोठा असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नाही. तेंव्हा राज्य सरकार त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून पळ काढत केंद्र सरकारला दोष देत आहे. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थापित करण्यासाठी 162 प्रेशर स्विंग एडसोर्पशन ऑक्सिजन प्लांटच्या इंन्स्टॉलेशनची मंजुरी जानेवारी 2021 ला दिली होती. मंजूर केलेल्या 162 प्लांट्समधून अशा 10 प्लांट्सच्या इंन्स्टॉलेशनची मंजुरी केंद्राने महाराष्ट्राला दिली होती. यावर युद्धपातळीवर जर काम केले असते तर आज परिस्थिती आली नसती. परंतु राज्य सरकारने या दिशेने कोणतेही पाऊले उचलली नसल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. यातूनच ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा आणि बेजवाबदार स्पष्टपणे दिसून येतो, असेही दानवे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मेट्रीक टन ऑक्सिजन दिले आहे. तसेच राज्य सरकारची विनंती मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्राने दिल्याची माहिती दानवे यांनी दिली.