Pooja Chavan Suicide Case : अधिवेशनापुर्वी संजय राठोड यांचा राजीनामा ? शिवसेनेनं आदेश दिल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या नाव संशयित म्हणून पुढे आले आहे. दरम्यान, भाजपसह विरोधकांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याबरोबरच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. विरोधकांचा वाढता दबाव त्याचबरोबर भाजपचा चक्का जाम आंदोलनाचा इशारा यामुळे आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पक्षनेतृत्वानेच राठोड यांनी राजीनामा द्यावा, असे निर्देश दिल्याची माहिती आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे राठोड यांचा पाय अधिक खोलात जात आहे. पूजा चव्हाण म्हणजेच पूजा राठोड होती आणि तिचा आत्महत्येच्या एक दिवस आधी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात गर्भपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच पूजाने आत्महत्या केली. त्याच्या काही तास आधी संजय राठोड यांनी पूजाला ४५ कॉल्स केले होते, असा दावा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.

भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री राठोड यांची हकालपट्टी करू शकतात. राठोड राजीनामा देणार नाहीत तोवर आम्ही विधिमंडळ अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला. तर राठोड यांनी राजीनामा न दिल्यास २७ फेब्रुवारील राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिला. १९ दिवस लोटले तरी पोलिसांनी एफआयआर का दाखल केला नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज ज्यांचा आहे त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांने स्वतःचे मत पोहोचवले आहे. त्यांच्या मते राठोड यांनी राजीनामा द्यायला हवा.