पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मंत्री संजय राठोड बोलणार ?; धर्मगुरुंच्या साक्षीने गुरुवारी आपली बाजू मांडण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांचा पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापला असून राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राठोड हे गायब झाले असून त्यांचा फोनही लागत नाही. त्यामुळे राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचदरम्यान राठोड हे येत्या गुरुवारी (दि. 18) माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी या गावात बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत या मंदिरात बसत असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यात राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून दिलेल्या ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. तत्पूर्वी, पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे लहू चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.