Yashomati Thakur News : पोलिसावर हात उगारणं पडलं महागात, मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्या आणि महाविकास आघाडी सरकारमधील महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. 8 वर्षांपूर्वीच्या एका खटल्याचा निकाल देताना न्यायालयानं यशोमती ठाकूर यांना ही शिक्षा सुनावली आहे.

8 वर्षांपर्वी 24 मार्च 2012 रोजी अमरावतीतील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणं आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणं या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा न्यायालयानं यशोमती ठाकूर यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाल्यानं त्यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजारांचा दंड ठोठावला आहे. तसंच या प्रकरणात यशोमती ठाकूर यांचा कारचालक आणि त्यांच्यासोबत असलेले 2 कार्यकर्ते दोषी आढळले आहेत. त्याचबरोबर फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.