#Surgicalstrike2 : भारतीय वायुसेनेच्या कारवाईला परराष्ट्र मंत्रालयाचा दुजोरा

दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. या हल्यानंतर आता परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी याबाबत अधिकृत घोषणा देत वायुसेनेने केलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे. विजय गोखले यांनी पत्रकार परिषद  घेत याबाबत माहिती दिली आहे.

विजय गोखले म्हणाले की, “पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. हा हल्ला जैश-ए-मोहम्म्द या संघटनेने केला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याचे मुख्यालय होते. तेथूनच सर्व सूत्र फिरवली जात होती. दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला भारताने वेळोवेळी बजावूनही पाकिस्तानने कोणतीही अॅक्शन यावर घेतली नाही. याउलट दहशतवादाला थारा दिल्याचे नाकारले. भारताच्या संसदेवर हल्ला झाला, नंतरही अनेक हल्ले झाले. जैश ए मोहम्मदचे हजारो जिहादी हल्ल्याच्या तयारीत होते. पाकिस्तानच्या मदतीशिवाय अतिरेकी असे कार्य होऊच शकत नाही” असेही गोखले यांनी म्हटले आहे.

“यानंतर आता भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केले आहे. ही कारवाई करताना सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची वायुसेनेने काळजी घेतली आहे.” अशी माहिती विजय गोखले यांनी दिली आहे.

पुढे बोलताना विजय गोखले म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये गेल्या दोन दशकांपासून दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालवले जात होते. मसूद अजहर सदर कॅम्प आणि जैश-ए-मोहम्मद ही संघटना चालवत होता. दरम्यान जैश-ए-मोहम्मद आणखी काही हल्ला करण्याच्या तयारीत होते. तेथे चालू असणाऱ्या कॅम्पमध्ये अनेक फिदाही, तसेच दहशतवादी तयार केले जात होते. परंतु भारताने कारवाई करत आता दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे.” याशिवाय जशी माहिती समोर येईल तशी दिली जाईल असेही विजय गोखले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत कोणतेही प्रश्न घेण्यास त्यांनी नकार दिला.

भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. बालाकोट, चकोटी, मुज्जफराबाद या तीन ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला आहे. भारताच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी या तीन ठिकाणी १ हजार किलो बॉम्बफेक करुन ही कारवाई केली आहे. पहाटे साडेतीन वाजता केलेल्या या हल्ल्यात भारताची सर्व विमाने आपले ठरलेले लक्ष्य साधून काही मिनिटातच परत सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परत आली आहेत. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद याचा कॅम्प उध्वस्त झाला आहे.