मोदी सरकारनं ‘DL’, ‘ट्रान्सपोर्ट’च्या कागदपत्रांची ‘वैधता’ 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या साथीचा प्रसार लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोटार वाहनांच्या कागदपत्रांची वैधता तारीख आणखी वाढवण्याची घोषणा केली. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या सर्व कागदपत्रांची वैधता जसे की फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत सल्लागार जारी केला आहे.

दुसऱ्यांदा वाढविली गेली वैधता
दरम्यान, मोटार वाहनांच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपणार होती, आता ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मोटार वाहनांच्या कागदपत्रांची वैधता वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी कागदपत्रांची वैधता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली होती. देशभरातील ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्या लक्षात घेता मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, संपूर्ण देशात लॉकडाउन लागू असल्याने ग्राहकांना त्यांच्या वाहनांचा परवाना नूतनीकरण करता येत नाही. त्यामुळे मंत्रालयाने वैधता कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला. या सवलती मंजूर झालेल्या प्रकरणांमध्ये वाहनांची फिटनेस, ड्रायव्हिंग लायसन्स परवानग्या, नोंदणी आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत समाविष्ट अन्य कागदपत्रांचा समावेश आहे.