धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरुवारी रात्री पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून आता सोनाली विजय पवार यांची  प्रकृती आता स्थिर आहे.

विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून मंगळवेढा तालुक्यातील ते पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. त्यांची नुकतीच मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून बदली झाली होती. सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते. होळीची सुट्टी असल्याने ते मुंबईहून घरी आले होते. घरी असताना मध्यरात्री उशिरा यांचा पत्नी सोनाली पवार यांच्याबरोबर घरगुती कारणावरुन वाद झाला. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याकडील रिव्हॉव्हरमधून पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या पत्नीला तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या जीवाचा धोका टळला आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस कर्मचारी हरिदास सलगर आणि इतर पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.