अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षे सक्तमजुरी 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमास दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा तिसरे जिल्हा न्यायाधीश ए. एस.सय्यद यांनी सुनावली आहे. हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील आरोपी नितीन प्रकाश वाढवे याने सप्टेंबर १५ पूर्वी पाच महिन्यापूर्वी शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळयात ओढले. या मुलीवर अधूनमधून बलात्कार केला.

२३ सप्टेंबर २०१५ रोजी ही मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असतानाही त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या दुचाकीवरुन नांदेडला नेले. नांदेडहून आपण औरंगाबादला जाऊ आणि तेथे लग्न करु असे आमिष त्याने दाखविले. परंतु ही मुलगी नांदेडला दुचाकीवर पडल्याने गंभीर जखमी झाली. आरोपीने तिला नांदेडलाच सोडून पळ काढला. या मुलीने नांदेड रेल्वेस्थानकावरील महिला सफाई कामगारांसोबत रात्र काढली. दुसऱ्या दिवशी तिला बसने गावी पाठवून दिले.

त्यानंतर तिने हदगाव पोलीस ठाणे गाठून आरोपी नितीनविरुध्द तक्रार दिली. तत्कालीन उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांनी तपास करुन या प्रकरणी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन जिल्हा न्यायालय नांदेड येथे दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एएसआय डी. आर. सिद्देवाड यांनी काम पाहिले. तिसरे जिल्हा न्यायाधीश ए. एस.सय्यद यांनी या प्रकरणात दहा साक्षीदार तपासून आरोपी नितीनला दोषी ठरविले आहे.