धुळ्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन गुजरात मध्ये अत्याचार ; चौघांवर गुन्हा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून अचोपडा, जळगाव, चोटालीसह गुजरात राज्यात बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

उंटावद येथील रहिवासी असलेली १६ वर्षीय मुलगी दि.१९ डिसेंबरपासून बेपत्ता झाली होती. अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करून कुटूंबियांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नंतर ती मुलगी कुटुंबीयांना सापडली. मुलीने दिलेल्या माहितीवरुन दि.२८ डिसेंबर रोजी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बलात्काराचे कलम वाढविण्यात आले आहे.

याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिरपूर तालुक्यातील खर्दे येथून तिच्या मुलीला गणेश राजू पारधी हा मोटारसायकलवर बसवून घेऊन गेला. त्याला भरत संतोष पारधी, दिनेश दंगल पारधी, मनोहर गंगाराम पारधी रा.उंटावद, ता. शिरपूर यांनी मदत केली. सुरुवातीला तिला दहिवद येथे नेले होते. तेथून गणेश पारधी सोबत जाण्यासाठी इतर तिघांनी तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली.

गणेश पारधीने मुलीला चोपडा, जळगाव, चोटाली व तेथून किम, गुजरात येथे बंडू दिलीप पारधी या नातेवाईकांच्या घरी नेले. या ठिकाणी दि.२१ डिसेंबर रोजी तिच्यावर गणेशने बलात्कार केला. यावरुन गणेश पारधी, भरत पारधी, दिनेश पारधी, मनोहर पारधी या चौघांवर भादंवि कलम ३६३ अन्वये दाखल गुन्ह्यात ३७६, ५०६, ३४ ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.