कारमधून आलेल्यांनी घरासमोर बसलेल्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, प्रचंड खळबळ

रांची : पोलीसनामा ऑनलाइन – झारखंडची राजधानी रांचीतील पंडरा ओपी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी घरासमोर बसलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या मुलीला लागल्या आहेत. गोळ्यांच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान, या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी दिवसा ढवळ्या १४ वर्षीय रुची कुमारी या मुलीवर जीवघेणा हल्ला केला असून, या हल्ल्यात रुची गंभीर जखमी झाली आहे. रुचीच्या पायाला आणि हाताला गोळी लागली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडरा ओपी येथे रुची कुमारी घरासमोर बसली होती. त्यावेळी कारमधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या रुचीला लागल्या. गोळ्या लागल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. दरम्यान, बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात हल्लेखोर कारमध्ये बसून फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गांजा तस्करीच्या आरोपाखाली रुची कुमारीचे मामा विकास सिंह यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गांजा कनेक्शनच्या वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.