नाशिक, बीड, जालना, नागपूरमध्ये बालअत्याचाराच्या घटना, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हैदराबाद आणि उन्नाव प्रकरणानंतर देश हादरुन गेला आहे. हैदराबादमध्ये डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. अशातच राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नागपूरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. तसेच तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. नाशिक, बीड, जालन्यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत.

नागपूरमध्ये चिमुरडीचा खून
नागपूरच्या कमळेश्वरमध्ये 5 वर्षाच्या मुलीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या मुलीचा मृतदेह एका शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीवर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मुलगी गुरुवारपासून बेपत्ता होती. तिचा संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीसांनी एका मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सर्व माहिती समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नाशिकमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
नाशिकमध्ये एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अंबड परिसरात शेजारीच राहणाऱ्या एका भाडेकरुने खेळण्याच्या बहाण्याने या मुलीला घराबाहेर बोलावून तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने कैलास कोकणी (वय-26) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जालन्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार
जालन्यातून अपहरण झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जालना शहरातील एका मुलीचे विक्री करण्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आले होते. तिला 23 दिवस हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. या दरम्यान तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून पोलीसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे.

बीड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बीड तालुक्यातील मैंदा गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आई-वडील ऊसतोड मजूर असून ते गेल्या महिना भरात ऊस तोडणीसाठी गेले होते. पीडित मुलगी आपल्या आजी-आजोबासोबत रहात होती. रस्त्यावरुन एकटी जात असताना त्याच गावातील 18 वर्षीय तरुणाने तिला बळजबरीने घरी नेऊन बलात्कार केला. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पिपंळनेर पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर मोमीन याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Visit : Policenama.com

You might also like