बोरं देण्याचे अमिष दाखवून माथेफिरुकडून दोन चिमुकल्यांचा खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – बोरं देण्याचे अमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करुन तिच्या भावासह तिला विहीरीत फेकून दिल्याची धक्कादाय घटना चोपडा तालुक्यातील धानोरा येथे घडली होती. याप्रकरणी माथेफिरुला पोलिसांनी अटक केली असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री बहीण-भावांच्या मृतदेहाचा शोध विहीरीत घेतला मात्र मृतदेह सापडले नाहीत. आज (शुक्रवार) पुन्हा शोध घेण्यात आला असता दोघांचे मृतदेह पोलिसांना सापडले.

माथेफिरु शेख खालीद शेख इस्माईल (वय ३४) याला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता बोरं खायला देण्याचे अमिष दाखवून दोघा चिमुकल्या भावा बहीणाला शेतात नेऊन या दोघांना विहिरीत फेकून दिले होते असे इस्माईल याने सांगितले. या घटनेतील मुलगी पाच वर्षांची तर मुलगा चार वर्षांचा आहे. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे या अल्पवयीन मुलीवर एका माथेफिरुने अत्याचार करुन तिला व तिच्या लहान भावाला विहीरीत फेकून दिल्याची कबुली दिली.

अटक केल्यानतंर संशयित वारंवार बालके फेकलेल्या जागा बदलून सांगत होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बालकांचा शोध लागला नव्हता. आज शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता धानोरा शिवारातील गट नं ४०४/१ मध्ये आनंदा बाजीराव पाटील यांच्या विहिरीजवळ मुलीची चप्पल सापडल्याने बालकांच्या मृतदेहाचा शोध लागला.