ठाण्यात शिवसेनेला धक्का; एका नेत्याच्या समर्थकांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मीरा-भाईंदर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच सरकार आहे, परंतु स्थानिक पातळीवर अद्यापही काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथील शिवसेनेचे स्थानिक नेते मेनेंजीस सातन यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे.

काशीमिरा हायवे येथे शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांचा दबदबा होता. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत सातन यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मीरारोडच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेचे बिनसले आहे. त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसमधील नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत होते, परंतु राज्यात सत्तेत एकत्र असताना या पक्षांतराकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.