महापालिकेत भाजप-शिवसेना ‘वाद’ पेटला, शिवसैनिकांनी केली तोडफोड

बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनावरून भाजप आमदाराला 'अर्वाच्य' भाषेत शिवीगाळ

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनावरून मीरा- भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना आज आक्रमक झाले. आज महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचा विषय घेतला नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर संतप्त शिवसेना नगरसेवकांनी तोडफोड करत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. विधानसभेच्या तोंडावरच हा राडा झाल्याने युतीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या बैठकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या विषयावर चर्चा होणार होती. मात्र, आजही कला दालनाचा विषय नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्थानिक आमदार मेहता हे यामध्ये आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यानंतर मेहता यांना शिवीगाळ करत नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृह, महापौर कार्यालयाची तोडफोड केली. जो पर्यंत कला दालनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नसल्याचा पवित्रा शिवसेना नगरसेवकांनी घेतला आहे.

काय आहे प्रकरण ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन सभागृह उभारण्याचा प्रस्ताव मीरा-भाईंदर महापालिकेने मंजूर केला होता. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. टेंडरही मंजूर करण्यात आले आहे. आचारसंहिता लागेल म्हणून महापालिका आयुक्तांनीही हा गोषवारा सचिवांकडे दिला आहे. मात्र, बजेट नसल्याचे कारण दिले जात आहे. आज हे दोन्ही विषय चर्चेत आले नाहीत. यामागे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे असून तेच या विषयाला टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.

You might also like