लष्कर-ए-तोयबाकडून मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे मिरारोड येथील पंचतारांकित सेव्हन इलेव्हन क्लब बॉम्बने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबा या दशतवादी संघटनेने मेलद्वारे दिली आहे. हे हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा मेल हॉटेलच्या अधिकृत इ – मेल आयडीवर आज (बुधवार) सकाळी आला असल्याची माहिती आमदार मेहता यांनी दिली आहे.

या धमकीच्या मेलमुळे एकच खळबळ उडाली असून हॉटेल वाचवायचे असेल तर 24 तासात 7 कोटी रुपये खात्यावर जमा करा, असे मेलमध्ये म्हटलं आहे. या मेलमध्ये 24 तासात 7 कोटी रुपये दिले नाहीत तर हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणू. यासाठी आम्ही शहीद व्हायला तयार आहोत, तसेच आमच्यासोबत तिथल्या लोकांचाही जीव घेऊ, त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, असा मजकूर या मेलमध्ये आहे. हा मेल मिळाल्यानंतर मेहता यांनी तात्काळ याची माहिती मिरारोड पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी मेहता यांची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलच्या मेल आयडीवर लष्कर – ए – तोयबाचा मेल आल्यानंतर तातडीनं संपूर्ण क्लब रिकामा केला असून संभाव्य धोका टाळण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. क्लबची कसून झडती घेण्यात येत आहे. सध्या क्लबचा ताबा पोलिसांनी घेतला असून, क्लबमध्ये जाणारे  सर्व प्रवेशद्वार बंद केले आहेत. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधीक्षक शांताराम वळवी म्हणाले, क्लबची तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.