मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारबाबत शरद पवारांचे ‘सूचक’ विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे. शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या परिस्थितीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्याला कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर विश्वास असून ते एखादा चमत्कार घडून सरकारला वाचवू शकतात, असे सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार म्हणाले, कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास असून त्यामुळे ते एखादा चमत्कार करु शकतात. कमलनाथवर माझा विश्वास आहे. आज नाहीतर उद्या ते काय करतील हे दिसेल असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर संघटनेमध्ये लगेचच जबाबदारी द्यावी, अशी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांची इच्छा होती. अशी टोकाची भूमिका कोणी घेतल्यास पक्षाला दोष देता येणार नाही. मात्र, मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात कुठला प्रयोग होऊ शकणार नाही, असे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले असून या सरकारला शंभर मार्क देऊ असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तमपणे काम करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.