मिराज लढाऊ विमानाला अपघात : दोन वैमानिकांचा मृत्यू

बंगळुरू : वृत्तसंस्था –  बंगळुरू येथे ‘मिराज २०००’ या भारतीय लढाऊ विमानाला अपघात झाला आहे. यामध्ये दोन पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी जवळपास ११ वाजून २० मिनिटांनी बेंगळुरूतील एचएएल विमानतळावर उतरत असताना ही दुर्घटना घडली.

स्क्वाड्रन लीडर नेगी आणि स्क्वाड्रन लीडर अबरोल अशी अपघातात मृत्यू झालेल्या वैमानिकांची नावे आहेत. दोन्ही पायलटनी हवेत विमानाला आग लागताच पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने जागीच मरण पावला, तर दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला. परंतु ही दुर्घटना कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

दुर्घटनाग्रस्त झालेले लढाऊ विमान मिराज-२००० हे प्रशिक्षणार्थी विमान होते. या विमानातील पायलटही प्रशिक्षणार्थी होते. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून हे विमान एचएएलद्वारे अद्ययावत केले गेले होते. तरीही या विमानाचा अपघात झाल्याने चौकशी करणार असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले. मिराज २००० हे लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनविलेले आहे. हे विमान हवाई आणि नौदलाच्या पायलटना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जाते.