घरात झालेल्या भीषण स्फोटात १० ठार

लखनऊ : उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील भदोही भागात एका घरात झालेल्या भीषण स्फोटात दहा जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात घराच्या भिंती कोसळल्या. त्या भिंती खाली काही जण दबले असल्याचा संशय बचाव कार्य करण्याऱ्या पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन मदतीसाठी घटना स्थळी धावले.

बेकायदेशीर फटाके बनवण्याच्या कारखाना मानवी वस्तीत थाटण्यात आला होता. रोटहा या छोट्या गावात हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी सतरंज्या बनवण्याचा कारखाना अस्तित्वात होता. त्या हि कारखान्याला या स्फोटाचा फटका बसला आहे. तसेच हा स्फोट फटाक्याच्या दारूमुळेच झाला आहे असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. तर या भीषण स्फोट अपघातात १० जण जागीच ठार झाले असल्याची माहिती पोलिस महानिरिक्षक पियूष श्रीवास्तव यांनी पत्रकारांना दिली आहे.

या दुर्घटनेत इरफान नामक २८ वर्षीय युवकाबरोबर १० लोक अपघातात ठार झाले आहेत. या अपघातात एक वृद्ध महिला ,एका लहान मुलासह तीन जण जखमी झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता कि क्षणार्धात घरे जमीनदोस्त झाली. तर मृतदेह देखील छिन्नविछिन्न झाले.मृत माणसांच्या मांसाचे तुकडे आणि घरातील सामान घटनेच्या स्थळापासून ४०० मीटर दूर उडाले आहेत. अशी माहिती तेथील जिल्हाधिकारी  राजेंद्र प्रसाद यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे बचाव कार्य अद्याप सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.