पुण्यात अभियांत्रिकीच्या परिक्षेत गैरप्रकार : 2 विद्यार्थ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील परिक्षे दरम्यान गैरप्रकार करणार्‍या दोन विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठ पोलसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्यांच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ऋषीकेश हनुमंत पिसाळ (19, रा.पुरंदर हॉस्टेल, सिंहगड महाविद्यालय आवार, आंबेगाव बुद्रुक) आणि शुभम किशोर केंचे (19, रा. अमित ब्लूम फिल्ड सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी प्राध्यापक माधुरी अभंग यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड महाविद्यालयाच्या वेणूताई चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या केंचेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून पिसाळ ऋषीकेश हा परिक्षा देत होता. शुक्रवारी वर्गातील पर्यवेक्षक अभंग यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर चौकशी सुरू झाली. केंचे याच्या नावाने पिसाळ परिक्षा देत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्राध्यापक अभंग यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केली. केंचे आणि पिसाळ यांच्याविरूध्द महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड तसेय परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारांना प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस.एम. खानविलकर हे गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.