तुमचे व्यक्तिमत्व आणि नात्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते वारंवार SORRY बोलण्याची सवय, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर कधी एखादी चूक झाली तर त्यासाठी माफी मागणे मोठेपणाचे लक्षण आहे. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी स्वताला दोषी मानत कोणतीही चूक नसताना वारंवार सॉरी बोलण्याची सवय तुमचे व्यक्तीमत्व आणि नात्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते.

कमजोर होत चाललेले मनोबल
नेहमी स्वताला दोषी समजण्याची सवय व्यक्तीचे मनोबल कमजोर बनवते आणि तो आत्महीनतेला बळी पडू शकतो. याशिवाय लहानपणी ज्या लोकांवर सक्ती केली जाते किंवा ज्यांचे पालक ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात, मोठे झाल्यावर अशा लोकांच्या मनात शंका कायम राहते की माझ्या या कामाने दुसरी व्यक्ती नाराज तर होणार नाही ना. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमजोर होतो.

हे नेहमी लक्षात ठेवा
काही मृदू हृदयी लोक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी स्वताला दोषी मानतात आणि अपराधीपणाची भावना त्यांच्या मनाला जाणवते. असे लोक आपल्या आनंदाबाबत विचार करणे सोडून देतात. आपल्या जवळपासच्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यांच्याकडून कौतूक मिळवण्याच्या हव्यासापोटी अशी व्यक्ती नेहमी दुसर्‍यांबाबतच विचार करत असतात. वेळ सरल्यानंतर अशा लोकांच्या जीवनात एक काळ असाही येतो, जेव्हा त्यांना जाणीव होते की, मी सर्वांसाठी इतके करतो, परंतु कुणाला माझी जराही पर्वा नाही.

इतकेच नव्हे, ज्या लोकांच्या मनात सतत अपराधीपणाची भावना असते, त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक आणि व्यवसायिक संबंधांवर सुद्धा याचा नकारात्मक परिणाम होतो. प्रत्येक माणसाचे व्यक्तिमत्व दुसर्‍यापेक्षा वेगळे असते. हे शक्य नाही की तुमची प्रत्येक गोष्ट इतरांना पसंत येईलच. अशवेळी जर तुमच्या समोर कुणी नाराजी व्यक्त केली, तरी स्वताला दोषी समजून मनात अपराधीपणाची भावना ठेवू नका. उलट आपल्यासाठी थोडा वेळ आवश्य काढा आणि आपल्या आनंदासाठी सुद्धा जगायला शिका.