सामुहिक बलात्कारातील पिडीतेची आत्महत्या, पोलिस निरीक्षकासह ५ जण तडकाफडकी निलंबीत

कानपूर : वृत्तसंस्था – आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सामुहीक बलात्कारीतील पीडित मुलीने आत्महत्या केली. ही घटना रायपुरवा मध्ये शुक्रवारी रात्री घडली. पोलीस पीडित मुलीचा मृतदेह खाली उतरवण्याचा प्रयत्न केले असता पीडितेचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांच्या हालगरजीपणामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. अडीच तास चालेल्या बाचाबाचीनंतर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना शांत केले.

पोलीस अधीक्षक अनंत देव यांनी घटनास्थळी धाव घेत या गुन्ह्यामध्ये हालगरजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन पीडितेच्या नातेवाईकांना दिले. त्यांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह खाली उतरवण्यास पोलिसांना परवानगी दिली. दरम्यान, या प्रकरणात हालगरजीपणा केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक देव यांनी पोलीस निरीक्षक, चौकी प्रभारी आणि दोन पोलीस शिपायांना शुक्रवारी रात्री निलंबित केले.

रायपुरवा येथील एका सुतारकाम करणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर १३ जुलै रोजी त्याच परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी तिचे अपहरण केले. वसिफ आणि वसाफ असे सख्या भावांची नावे आहेत. मुलीचे अपहण केल्यानंतर भाऊ आणि त्यांचे मित्र श्यामू आणि सम्मू यांनी तिच्यावर सामुहीक बलात्कार केला. १४ जुलैरोजी पीडीत मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. या घटनेनंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

पोलिसांनी योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर कित्येक दिवस पोलीस ठाण्यात चक्रामारल्यानंतर अखेर २७ जुलै रोजी म्हणजेच १३ दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली नाही.
शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास मुलीचे कुटुंबातील बाहेर गेले होते. त्यावेळी तिने घारातील छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हालगर्जीपणा केल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलिसांना मृतदेहजवळ जाऊ देण्यास विरोध केला. अडीच तास चालेल्या या गोंधळानंतर पोलीस अधीक्षकांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आरोग्यविषयक वृत्त