काँग्रेस-शिवसेनेत समन्वयाचा ‘अभाव’, संजय राऊतांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीत सीएएच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना गैरहजर असल्यानं चर्चा सुरू झाली होती. असंही म्हटलं जात होतं की, शिवसेनेला यासाठी आमंत्रण दिलं नव्हतं. परंतु याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचा संपर्क झाला आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही मी बोललो आहे. अहमद पटेल आणि माझाही संपर्क झाला आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं त्यामुळे थोडी गडबड झाली. ती पुढे होणार नाही याची काळजी घेऊ.” असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “याआधी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की, या कायद्यात काही त्रुटी आहेत. त्या दूर झाल्या पाहिजेत. देशभरात या कायद्यावरून जे वादळ निर्माण झालं आहे ते सर्व पाहता सर्व स्तरातून त्याला विरोध होताना दिसत आहे. या कायद्याने हिंदू-मुसलमान अशी विभागणी करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला यश आलं नाही. राज्यात सर्व जाती धर्माचे लोक राहतात.”

संजय राऊत असेही म्हणाले, “जिथे भाजपची राज्ये आहेत तिथे सर्वात हिंसक आंदोलने झाली. हे पाहता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती की हा कायदा जबरदस्तीने लादला जाणार नाही. जोपर्यंत काही गोष्टींचा खुलासा होत नाही तोवर ते शक्य नाही. देशातील नागरिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मग ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असो. इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर आमचे कुणाशी मतभेद असण्याचा प्रश्नच नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/