बेपत्ता व्यक्तीला स्कॉर्पिओ बक्षिस मिळाली, कंपनीने पाठवले कुटुंबियांना पत्र

पोलीसनामा ऑनलाईनः गेल्या अडीच वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या नावावर बक्षिस म्हणून महिंद्रा स्कॉर्पियो लागली आहे. बेपत्ता व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नाही परंतु तो जिवंत असल्याचा पुरावा कुटुंबाला मिळाला. त्यामुळे बेपत्ता मुलाच्या आई- वडिलांना पुन्हा आस लागली आहे. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे.

सोलन जिल्ह्यातील ग्राम पंचायत पलोगच्या नेर गावातून बेपत्ता असणाऱ्या पवन कुमार यांच्या घरी औषध कंपनीकडून एक पत्र मिळाले.पवन कुमारने एका औषध कंपनीतून औषध खरेदी केले होते. कंपनीकडून मिळालेल्या कुपनमध्ये पवन कुमारला महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली आहे. याबाबत पवन कुमारचे वडिल नंदलाल शर्मा म्हणाले की, जवळपास अडीच वर्षापूर्वी पवन कुमार संध्याकाळी येतो, असे सांगून हा घरातून निघून गेला होता. तो पुन्हा कधीच परतला नाही. त्यादिवसापासून पवन कुमार घरातून बेपत्ता आहे. पवन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. काही दिवसांपूर्वी औषध कंपनीकडून पवन कुमार यांच्या घराच्या पत्त्यावर एक पत्र आले, हे पत्र वाचून आई-वडिलांना मोठा आनंद झाला आहे.

या पत्रात पवन कुमारला मोटार मिळाल्याची माहिती मिळाली त्यापेक्षा गेल्या अडीच वर्षापासून बेपत्ता मुलगा जिवंत असल्याचे समजताच आई-वडिलांना आनंद झाला. कुटुंबाने कंपनीच्या अधिकाऱ्यांची संवाद साधला, तेव्हा त्यांनी सांगितले की, पवन कुमारने अडीच महिन्यांपूर्वी औषधे खरेदी केली होती. त्यावेळी मिळालेल्या कुपनमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओ बक्षिस म्हणून लागली. पवन कुमार यांची कागदपत्रे जमा केल्यानंतर बक्षिस कंपनीकडून मिळणार आहे.

बेपत्ता पवन कुमारला शोधण्यात यश मिळेल- डीएसपी प्रताप सिंह
दरम्यान, औषध कंपनीकडून आलेल्या पत्रानंतर पवन कुमार यांचा शोध घेण्यात मदत मिळणार आहे, संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून, लवकरात लवकर पवन कुमार यांचा ठावठिकाणा सापडण्यात यश मिळेल असा विश्वास जिल्ह्याचे डीएसपी प्रताप सिंह यांनी व्यक्त केला आहे.