काय सांगता ! होय, भाजप खासदार ‘बेपत्ता’ झाल्याची ‘पोस्टरबाजी’, ‘जिलेबी’ खाताना दिसले होते ‘म्हणे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर बेपत्ता असल्याचे पोस्टर लागले आहेत. तुम्ही यांना कुठे पाहिले आहे का ? ते अखेरचे इंदूरमध्ये जिलेबी खाताना दिसले होते. तेव्हापासून बेपत्ता आहेत. पूर्ण दिल्लीकर यांचा शोध घेत आहेत. असे या पोस्टरवर लिहले आहे.

दिल्लीमध्ये प्रदूषणाची गंभीर समस्या असून यासंबंधी संसदेच्या शहर विकास स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. दिल्लीतील प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला गंभीर याने दांडी मारली आणि तो इंदूरमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी समालोचक म्हणून उपस्थित राहिला. माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या सोबत जिलेबी आणि पोहे खाताना गंभीरचा फोटो समोर आला होता. बैठकीला दांडी मारून जिलेबीवर ताव मारतानाचे गंभीरचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे तसेच त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर निशाणा साधला होता. आम आदमी पक्षाने ट्विटरवर गौतम गंभीर यांचा जिलेबी खातानाचा फोटो शेअर करत गंभीर यांच्यावर प्रदूषणाचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

Visit : Policenama.com