NSUI कडून गृहमंत्री अमित शहा ‘बेपत्ता’ असल्याची पोलिसांत तक्रार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दिली आहे. करियप्पा यांनी बुधवारी (दि. 12) तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या संकट प्रसंगी पळून न जाता देशवासियांची काळजी घेणे आणि त्यांची सेवा करणे हे राजकीय व्यक्तीचं काम असल्याचे नागेश करियप्पा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. करियप्पा यांनी पोलिसांत गृहमंत्री अमित शहा यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलीस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी आल्याचा दावा, NSUI चे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला आहे.

लोकेश चूग यांनी सांगितले की, 2013 पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बांधिल होते. भाजप सत्तेत आल्यानंतर हे चित्र पालटले. महामारी सारख्या कठीण काळात पंतप्रधान पदानंतर दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती मात्र गायब झाली आहे, असे चूग यांनी म्हटले.

NSUI ने दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि त्यांची जबाबदारी घणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, आत्ताचे सरकार यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे NSUI नं गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तर लवकरात लवकर देईल, अशी अपेक्षा आहे.