पुण्यातील आयसर संस्थेतून विद्यार्थी बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) बीएस एमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी मागील दहा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. विकास कुमार हिमांशू (वय – 23) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा झारखंडचा रहिवाशी आहे. हिमंशू याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार चतु:शृंगी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. तसेच त्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती संस्थेच्या @IISERPune ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

हिमंशू हा हुशार विद्यार्थी अशी त्याची ओळख आहे. गेल्या 16 फेब्रुवारीला त्याला संस्थेच्या आवारात शेवटचे पाहिले असल्याची माहिती त्याच्या मित्रपरिवाराने दिली. त्याची परीक्षा सुरु होती. सलग दोन दिवस तो परीक्षेसाठी गैरहजर राहिल्याने तो नक्की कुठे गेला, हा प्रश्न त्याच्या मित्रांना पडला आहे. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्राध्यापकांना हिमंशू बेपत्ता असल्याची माहिती दिली.

यानंतर संस्थेच्यावतीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात हिमांशू बेपत्ता झाल्याची तक्रार 19 फेब्रुवारी रोजी दिली. संस्थेतील विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून त्याचा शोध घेतला. मात्र, तो अद्याप सापडला नाही. हिमांशू 16 फेब्रुवारीला आयसरच्या आवारात असलेल्या संस्थेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर तो सीसीटीव्हीत दिसत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.