राहुल कुल यांच्या विजयाने अजित पवारांबाबतचा गैरसमज दूर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – बारामतीची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या दौंड तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीत दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा पुन्हा विजय झाल्याने अजित पवारांबाबत असणारा मोठा गैरसमज आता दूर झाला आहे. वास्तविक पाहता दौंडमध्ये कोणतीही मोठी निवडणूक असेल आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार नाहीत असे जर कोणी म्हटले तर त्याला वेड्यात काढले जाईल यात शंका नाही.

परंतु तसा काहीसा प्रकार या तालुक्यात घडला आणि त्याबाबत मोठ्या प्रमाणावर तालुकाभर चर्चा ही झाली. संपूर्ण राज्यामध्ये अजितदादा पवार हे परखड आणि आक्रमकपणे आपले मत व्यक्त करणारे नेते म्हणून परिचित आहेत परंतु कधी कधी त्यांच्या या परखडपणामुळे निवडून येण्याची शक्यता असणारा उमेदवार पडतो असा गैरसमज २०१४ साली अजित दादांच्या भाषणानंतर दौंडकरांना झाला होता.

२०१४ साली विधानसभा निवडणूक ऐन रंगात असताना त्यावेळी उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचार सभेमध्ये महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्यावर सात पिढ्या गारद होतील असा डाव टाकण्याचे विधान केले होते या विधानानंतर दौंड तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याबाबत सहनुभीती तयार होऊन ते निवडून आले असा गैरसमज पसरवला गेला आणि त्यामुळेच की काय यावेळी झालेल्या लोकसभेला आ. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या असतानाही कोणत्याच जाहीर सभेला अजितदादा उपस्थित राहिले नाही.

आता नुकत्याच झालेल्या विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या विरोधात भाजपकडून पुन्हा राहुल कुल हे उभे असतानाही अजित पवारांनी तालुक्यात एकही सभा घेतली नाही अशी मोठी चर्चा झाली मात्र इतके होऊनही भाजप-महायुतीचे उमेदवार राहुल कुल हे राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांचा पराभव करून यावेळीही निवडून आले आणि अजित पवारांच्या आक्रमक भाषणामुळे दौंडचा उमेदवार पडतो हा समज चुकीचा ठरला गेला.

Visit : policenama.com