मुख्यमंत्र्यांकडून पदाचा गैरवापर, पत्नी अमृताच्या बँकेला दिले झुकते माप, न्यायालयात याचिका

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आपल्या बँकेतच अधिकारी असल्याने बँकेकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून त्या जेथे जेथे जातात तेथे बँकेचे नाव निघत असल्याने बँकेकडून त्यांना सवलती दिल्या जातात. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पदाचा गैरवापर करुन पत्नीच्या बँकेला झुकते माप दिल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दीड लाख हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेतून अ‍ॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मोहनीश जबलपुरे यांनी न्यायालयात केली आहे.

राज्य सरकारने ११ मे २०१७ रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना अ‍ॅक्सिस बँकेत बँक खाते काढण्याचा आदेश दिला व यापुढे आता सर्वांचा पगार या अ‍ॅक्सिस बँक खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितले होते. हा आदेश जेव्हा पोलिसांपर्यंत पोहचला, तेव्हा त्यांच्यात खूप नाराजी निर्माण झाली होती. त्या त्या शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही शासनाच्या या निर्णयाचे समर्थन करणे अवघड झाले होते. शासनाच्या या निर्णयामुळे स्टेट बँकेसह अनेक राष्ट्रीयकृत बँकेचा मोठा तोटा होऊन त्यांचा सर्व व्यवसाय एका आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या पदरात टाकला होता.

सरकारने या परिपत्रकाप्रमाणे घेतलेले सर्व निर्णय रद्द करावेत, हा निर्णय घेताना अ‍ॅक्सिस बँक आणि राज्य शासनामध्ये काय करार झाला आणि त्या निर्णयानंतर जेवढी पैशांची देवाणघेवाण झाली या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जबलपुरे यांनी न्यायालयाकडे केली आहे. येत्या महिन्याअखेरीस ही याचिका नागपूर खंडपीठामध्ये सुनावणीला येण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –