दुसऱ्याच्या नावे पोलीस कॉस्टेबल पदाची ऑनलाईन परीक्षा देणारा तोतया गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्याच्या नावे ऑनलाईन परिक्षा देणाऱ्या तोतयाला परीक्षार्थीला एमआयडीसी सिडको पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) अटक केली. टेक्नोलॉजीचा दुरुपयोग करत ऑनलाईन परीक्षेत फसवेगिरी करणा-या या तरुणाच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. अर्जुन बाबुराव बिघोत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची माहिती अशी की, दिल्ली पोलीस दलातील रिक्त पदासाठी 27 नोव्हेंबर रोजी देशभर ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले होते. चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल झोन येथे अमोल गडवे (रा. केळगांव, ता. औरंगाबाद) या उमेदवाराची परिक्षा होती. ग्राउंड फ्लोअरवरील हॉलमध्ये अमोलच्या नावाने अर्जुनने परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळविला. परीक्षा सुरू झाल्यावर तो कानाला हात लावून हळू आवाजात कुणासोबत तरी बोलत असल्याचे परिक्षा केंद्रातील आयटी मॅनेजर प्रशांत महाकाळ यांच्या निदर्शनास आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याचे हॉल तिकिट तपासले असता ते अमोल गडवेचे असल्याचे दिसून आले. आरोपी स्वतःचे नाव अमोल गडवे असे सांगत होता.

मात्र हॉलतिकिटावरील छायाचित्र त्याच्याशी जूळत नसल्याने त्यांचा संशय बळवला. यानंतर केंद्र व्यवस्थापक मनोज प्रभाकर अंबाडे यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांना पाहुन त्याला घाम फुटला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या दोन्ही कानात मायक्रो मक्खी एअर फोन होते. तर बनियनच्या खिशात ट्रान्समीटर , एटीएम कार्ड, ब्ल्यू ट्रूथ असे डिव्हाइस लपविलेले दिसले. परिक्षेत कॉपी करण्यासाठी त्याने हे साहित्य सोबत आणल्याचे समोर आले. तो एअर फोन आणि ट्रान्समीटरच्या माध्यमातून परिक्षा केंद्राबाहेर बसलेल्या व्यक्तीला प्रश्न पत्रिकेतील प्रश्न सांगून त्यांच्याकडून अचूक उत्तरे मिळवून परिक्षा देत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या तोतयागिरीचा भंडाफोड झाल्यावर मनोज अंबाडे यांची आरोपीविरुध्द एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरिक्षक संजय मांटे तपास करीत आहेत.

यासाठी आरोपीने घेतले होते 1 लाख रुपये
दरम्यान आरोपीने मित्राच्या नावे परिक्षा देत असल्याचे सांगितले असले तरी त्याने यासाठी 1 लाख रुपये घेऊन परिक्षा देण्यासाठी तो उपस्थित होता असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले.