पेपरफुटी प्रकरणी ‘एमआयटी’चा विद्यार्थी ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचा ‘इंजिनिअरींग मेकॅनिक्स’ विषयाची प्रश्नपत्रिका बुधवारी परीक्षा सुरू असतानाच सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. ही बाब गांभीर्याने घेत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने त्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तपास पथक स्थापन केले होते. या पथकाला तपासात यश आले असून याप्रकरणी पौड रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थ्याला शनिवारी (दि.२६) ताब्यात घेण्यात आले आहे. आदर्श रवींद्रन असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अभियांत्रिकी पेपरफुटीप्रकरणाचा उलगडा करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीटाच्या तपास पथकाला यश आले आहे. एका विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात मोबाईल नेऊन प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून बाहेर पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा खोडसाळपणा करणा-या विद्यार्थ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच, याबाबतचा सविस्तर अहवाल आल्यानंतर महाविद्यालयाच्या हलगर्जीपणाबद्दल कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, आदर्श हा पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रावर १५ मिनिटे उशिरा पोहोचला. वर्गातील शिक्षकांची नजर चुकवून त्याने मोबाईल सोबत नेला. हा मोबाईल त्याच्या मित्राचा होता. वर्गात गेल्यानंतर त्याने लगेच प्रश्नपत्रिका घेऊन मोबाईलवर छायाचित्र काढली. त्यानंतर लगेचच छायाचित्रे मोबाईलद्वारे बाहेर पाठवून त्याने मोबाईल पुन्हा बॅगेत ठेवला. विद्यापीठाचे तपास पथकाने केलेल्या चौकशी आदर्शने गुन्हा कबूल केला आहे. त्यानुसार त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाविद्यालयाकडून त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.