मिथुननं कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त फेटाळले, म्हणाले – ‘Corona? छे, ही तर केवळ अफवा, मी तर सुट्टी एन्जॉय करतोय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त दुपारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र काही तासांतच ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले. खुद्द मिथुन चक्रवर्ती यांनी ही अफवा असल्याचे सांगत मी तर सुट्टी एन्जॉय करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

फिल्मफेअरशी बोलताना मिथुन यांनी कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्टपणे नाकारले. मला अजिबात कोरोना वगैरे झाला नाही. मी तर सुट्टी एन्जॉय करत आहे. गेल्या महिनाभरापासून पश्चिम बंगालमध्ये प्रचार केल्यानंतर आता मी बेउली दाळ व आलू पोस्टो खात मजेत सुट्टी घालवत असल्याचे स्पष्ट केले. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या महिनाभरापासून मिथुन पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार करत होते. मिथुन चक्रवर्ती यांनी दोन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोठी यांच्या सभेदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.