आरोग्यदायी निरात भेसळ, एफडीएने नष्ट केला १४६ लिटर निरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – अस्वच्छ ठिकाणी साठवणुक आणि निरात बर्फ टाकून भेसळ केल्याप्रकरणी एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. सोमवार पेठेतील  जुन्या जिल्हा परिषदेजवळ निरा सहकारी सोसायटी लिमिटेडवर गुरूवारी कारवाईचा बडगा उगारत एफडीएच्या पथकाने १४६ लीटर निरा नष्ट केली आहे. तर त्या निराचे नमुने राज्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत.

ताडीच्या झाडांना रात्रीच्या वेळी छिद्र पाडून (टॅपिंग) त्यातून निरा मडक्यामध्ये साठवला जातो.  निरा केवळ रात्रीच्या वेळीच मिळते. त्यावर सुर्यप्रकाश पडला किंवा जास्त वेळ साठविले तर त्याची ताडी बनते. पुणे जिल्हयात तीन ते चार हजार ताडीची झाडे असल्याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. दररोज या झाडांपासून मिळणारा निरा जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीजवळील निरा सहकारी सोसायटीच्या केंद्रात आणला जातो. त्यानंतर शहरातील निरा केंद्रांवर विक्रीसाठी वितरित केला जातो. पुण्यात सुमारे ३०० ते ३५० निरा विक्रेते एफडीएकडे नोंदणीकृत आहेत.

त्या सर्व विक्रेत्यांना निरा सोसायटीकडून वितरित केला जातो. परंतु उन्हाळ्यात शीत पेय म्हणून नागरिक याची मागणी जास्त करतात. निरा विक्रेत्यांकडून शुध्द निरेऐवजी इतर गोष्टींची भेसळ केली जात आहे. निरामध्ये तुरटपणा येण्यासाठी प्रामुख्याने चुन्याची निवळी मिसळली जाते. तर पांढरटपणा येण्यासाठी तांदूळ भिजवलेले पाणीही मिसळले जाते. निरामध्ये भेसळ केली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर ‘एफडीए’ कडून निरा सोसायटीची तपासणी केली तेव्हा त्यात बर्फाची भेसळ होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ती अस्वच्छ ठिकाणी साठविली असल्याचेही समोर आले. त्यामुळे ही निरा नष्ट करण्यात आली. अशी माहिती सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.

ही कारवाई एफडीएचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संपत देशमुख, संजय नारागुडे, अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी , सीमा सोनकांबळे यांनी ही कारवाई केली.