जबरा दोस्त ! ‘फ्रेन्डशीप’चं असं उदाहरण की जग लक्षात ठेवणार, 3000 KM जाऊन मित्राचं पार्थिव पोहचवलं घरी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   मैत्री म्हणजे शोले चित्रपटातील जय-वीरू सारखीच नसते. काही लोक आयुष्य संपल्यानंतरही मैत्री टिकवतात. असेच काही चेन्नईमध्येही पाहायला मिळाले जिथे मित्राच्या मृत्यूनंतर दुसर्‍या मित्राने लॉकडाऊन दरम्यान 3000 किमीचा प्रवास करत मृतदेहास मिझोरममध्ये त्याच्या कुटुंबियांजवळ अंतिम दर्शनासाठी पोहोचविले.

मिझोरममध्ये राहणाऱ्या विवियन लालरेसमांगा या 28 वर्षीय तरूणाचे 23 एप्रिल रोजी चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विवियनचा मित्र एविएल मालछनिमा यांनी कुटुंबियांना अंतिम दर्शनासाठी त्याचे पार्थिव 3000 हजार किलोमीटर मिझोराम येथे पोहोचविण्याचा निर्णय घेतला. यात जेयंतीजरण आणि चिन्नाथम्बी हे दोन रुग्णवाहिका चालकही त्यात सामील झाले. दोन्ही रुग्णवाहिक चालकांनी 84 तास सतत गाडी चालविली आणि चार दिवसांत चेन्नईहून मिझोरमची राजधानी आयजोल गाठली. आयजोल येथे पोहोचल्यानंतर मित्राने लालरेसमांगाचा मृतदेह त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडे सोपविला. या प्रक्रियेदरम्यान, तिघांनी सामाजिक अंतर देखील पाळले.

रुग्णवाहिका मिझोरमला पोहोचताच लोकांनी टाळ्या वाजवून चालक आणि मृताच्या मित्राचे स्वागत केले. लोकांनी दोन्ही ड्रायव्हर्सचे मोठे कौतुक केले. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनीही ऑनलाइन पोस्टच्या माध्यमातून या लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीट करून लिहिले आहे, मिझोरम अशा खऱ्या हिरोंचे स्वागत करतो कारण आम्हाला मानवता आणि राष्ट्रीयत्वावर विश्वास आहे.