बँक गैरव्यवहार प्रकरणात आमदार अनिल भोसलेंसह चौघांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील 71 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेले आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना विशेष न्यायालयाने 6 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. विशेष न्यायाधिश ए. एस. गोसावी यांच्या न्यायालने हा आदेश दिला.

आमदार अनिल शिवजीराव भोसले (वय-55 रा. बाणेर रस्ता) सुर्याजी पांडुरंग जाधव (वय-69 रा. कमला नेहरु पार्क), तानाजी दत्तु पडवळ (वय-50 रा. तापकीरनगर, काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले  (वय 47 रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर ) असे पोलिस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लेखा परिक्षक योगेश लकडे (वय-39, रा. आंबेगाव नर्हे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोसले हे बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना, जाधव संचालक होते. तसेच पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशोबतपासणीस होते, असे यावेळी अतिरीक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी न्यायालयात सांगितले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या कंपनीला बँकेच्या रोख शिल्लक रक्कम बाबत पडताळणी करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार फिर्यादींनी लेखापरिक्षण केले. त्यात बँकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रूपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखविले. तसेच ही रक्कम बँकेच्या मुख्य शाखेकडे पाठविण्यात आलेल्याचे दाखविले. मात्र मुख्य कार्यलयात रोख रक्कम ठेवण्याची सोय नसताना कागदोपत्री मुख्य कार्यालयात पाठविल्याचे दाखविले. पदाचा गैरवापर करून सुमारे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपयांचा अपहार केला. ही रक्कम त्यांनी स्वत:च्या फायद्याकरीता वापरली असल्याचे त्यांनी यावेळी न्यायालयात सांगितले.

रक्कमेविषयी त्यांच्याकडे चौकशी करायची असून, बँकेत झालेल्या गैरकारभाराविषयी  चौकशी करायची आहे. आरोपींची बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी माहीती घ्यायची आहे, आरोपींनी या रक्कमेचा वापर कशाकरीता केला याची माहीती घ्यावयाची आहे. या गुन्हयाशी संबंधित कागदपत्रे आरोपींकडून हस्तगत करायची आहे, या बँकेतील गुंतवणुकदार, ठेवीदारांना त्यांची रक्कम परत दिली गेली. आदी तपास करायचा असल्याने पठारे यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती. तर आरोपींच्या वतीने एस. के. जैन, हर्षद निंबाळकर, बिपीन पाटोळे, ऋषिकेश गाणू आणि यशपाल पुरोहित यांनी बाजु मांडली.

गुन्हा दाखल झाल्यापासून अटक केलेले सर्वजण पोलिसांना तपासात सहकार्य करत आहेत. पोलिसांनी सर्व कागदपत्रे जप्त केली असून पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला.

You might also like