‘शाळांना सरसकट अनुदान द्या’ : आमदार प्रा. आसगावकर

कोळा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अनुदानित- विनाअनुदानित शाळा हा प्रकार बंद करून जे काही अनुदान द्यायचे असेल ते सर्वच शाळांना सरसकट द्यावे, यासाठी आम्ही आमची भूमिका सरकारपुढे मांडणार असल्याचे मत पुणे शिक्षक संघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर (MLA Jayant Asgavkar ) यांनी व्यक्त केले.

सांगोला तालुक्‍यातील जुनोनी येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. आसगावकर म्हणाले, जुन्या पेन्शनसाठी नेमलेली समिती बरखास्त करा, अन्यथा त्या समितीमध्ये एक शिक्षक आमदार प्रतिनिधी घ्या अशी भूमिका मांडणार आहोत. तसेच टप्पा अनुदानाची सुद्धा तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्वरित पगार सुरू करण्याची भूमिका शिक्षणमंत्री व अर्थमंत्री यांनी आमच्यासमोर कबूल केली आहे. त्यामुळे तपासण्या पूर्ण झाल्यानंतर तत्काळ शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागेल. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, खेळाडूंसाठी भत्ता दिला जाणार आहे, यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत. या वेळी जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य ऍड. सचिन देशमुख, माजी प्राचार्य शितोळे, सुनील भोरे आदी उपस्थित होते. या वेळी कोळा जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांच्या वतीने ऍड. सचिन देशमुख यांनी नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला.