…अन् मंत्र्यानेच हाती मोबाईल घेऊन काढला मुलांचा फोटो

पोलीसनामा ऑनलाईऩ – हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवशी राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजला. मात्र या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक वेगळीच घटना विधानसभा भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरिन ड्राइव्हवर घडली. या घटनेचे फोटो आणि नक्की काय घडले यासंदर्भात कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी सोशल नेटवर्किंगवर लिहिलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये आ. काळे यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( Minister of State for Public Works Dattatray Bharne) यांच्यासोबत अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर मरिन ड्राइव्हला गेले असता घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.

झाले असे की सोमवारी अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर सांयकाळी आ. काळे आणि मंत्री भरणे ये दोघेही मरिन ड्राइव्हवर फेरफटका मारायला गेले होते. मात्र यावेळी येथील काही तरुणांनी भरणे यांना ओळखले नाही आणि आमचा एक फोटो काढा ना म्हणत थेट राज्यमंत्र्यांच्या हातात फोन दिला. यासंदर्भात लिहिताना काळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, आज विधिमंडळाचे कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत मरिन ड्राईव्हला गेले होतो. त्यावेळी काही मुलांनी भरणे यांना न ओळखता आमच्या ग्रुपचा फोटो काढता का म्हणून विचारणा केली.

तरुणांनी राज्यमंत्र्याकडे ही विनंती केल्यावर काय झाले यासंदर्भात काळे लिहितात, त्यांनी लगेच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. त्यावेळी भरणे मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नाही. राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे यांचा साधेपणा मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. या पोस्टमध्ये काळे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तरुणांचा एक ग्रुप मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर बसला असून समोर पांढऱ्या कपड्यांमध्ये भरणे हे मोबाईल घेऊन या ग्रुपचा फोटो काढताना दिसत आहेत.

भरणे यांच्या या साधेपणासंदर्भात पुढे काळे यांनी, मोठी माणसे उगाच मोठी होत नाहीत. पदाचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा सामान्य माणसात सामान्य होऊन राहण्यात देखील मोठेपणा असतो. आदरणीय पवार साहेब यांच्याकडून ही गोष्ट नेहमी शिकायला मिळाली. राष्ट्रवादीत पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेला प्रत्येक जण त्यांनी दिलेल्या विचारांनीच वाटचाल करत आहे यात शंका नाही, असे त्यांनी म्हटले आहे.