आमदार बच्चू कडूंनी जाळली आयुक्तांची खुर्ची 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करीत आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेसमोर आयुक्तांची (प्रतीकात्मक) खुर्ची जाळली. वारंवार मागणी करून देखील दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी महापालिकेकडून होत नसल्याने संतप्त झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन करीत खुर्ची जाळली. त्यांच्या या आंदोलनामुळे काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
यापूर्वी देखील आमदार बच्चू कडू यांनी प्रहारतर्फे महापालिकेसमोर आंदोलन केले होते. तेव्हा त्यावेळी स्वतः आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले होते. दिव्यांगांना थेट २ हजार रुपये मासिक मानधन सुरू करण्यात येईल, त्यांना व्यवसायासाठी विविध फुटपाथवर स्टॉल दिले जातील. पालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल, विविध विभागात त्यांना शासकीय कंत्राटी सेवेत सामावून घेतले जाईल. तसेच घरकुल योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल.
अशी आश्वसने दिली होती मात्र ही फक्त आश्वसनच ठरली  प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे संतप्त प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आजआंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यावेळी सोमवारी सकाळी गाजर वाटप आंदोलन करण्यात आले. दुपारी दीड वाजता आमदार बच्चू कडू आंदोलनात सहभागी झाले व आक्रमक होत यावेळी आयुक्तांची (प्रतीकात्मक) खुर्ची जाळण्यात आली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात बैठक झाली व तातडीने दिव्यांगांना धनादेशाचे वाटपही करण्यात आले.