राजसाहेब कार्यकर्त्यांच्या पोशाखात येतील तेव्हा मजा येईल

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब सध्या साहेबाच्या पोशाखात आहेत, ते कार्यकर्त्यांच्या पोशाखात येतील तेव्हा मजा येईल असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी  ही प्रतिक्रिया दिली. ते वर्धा येथे प्रहार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. सध्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून याच मुद्द्यावर बच्चू कडूंनी पत्रकारांशी संवाद साधला.

कडू म्हणाले, अवनी वाघिणीने १४ जणांचे बळी घेतले. कदाचित ती दिल्ली, मुंबईच्या एखाद्या परिसरात फिरली असती तर काय केले असते. १५ बळी जाईपर्यंत सरकारने वाट का पाहिली? बोकडे, कोंबड्या मेल्या तर चर्चा होत नाही. एक वाघीण मेली तर देशभर चर्चा होते. पण साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर याची चर्चा होत नाही.

शेतकरी कोंबड्या, बकऱ्यांच्या रांगेत आहे. आमदार, खासदार, एखादा अधिकारी मेला तर तो वाघाच्या रांगेत जाऊन बसतो, ही विषमता आहे. किमान मरणाला समान न्याय दिला पाहिजे, अशा व्यवस्थेची त्यांनी मागणी केली. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मर्दानगी दाखवावी. पीक विमा योजना चांगली आहे. मात्र, जाणीवपूर्वक मंत्र्यांच्या मर्जीतील कंपनीला कंत्राट देण्यात आले. विम्याची रक्कम जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांवर  कारवाई करत सरकारने मर्दानगी दाखवून द्यावी, असे बच्चू कडू म्हणाले.